असं घडतं बऱ्याचदा...की एखादं मुल ... घरची परिस्थिती एकदम बेताची असताना .... विशेष असं काही जमत नसताना .... फक्त आणि फक्त डोळ्यातली स्वप्नं, काही करण्याची जिगर, काहीतरी करून दाखवण्याची कमालीची भूक .... यांना सोबतीला घेऊन घराबाहेर पडतं... कदाचित काम करण्याचं वयही नसतं तसं त्याचं ....घरामध्ये असणाऱ्या त्याच्या आईबापाने आयुष्यभर मर मर कष्ट उपसलेले असतात .... आता त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलाने काहीतरी करावं ... या अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन तो बाहेर पडतो .... खेळण्या-बागडण्याच्या वयात, हसण्या-खिदळण्याच्या वयात त्याला काम करावं लागतं ... आपल्याला सगळ्यात छान वाटणारं बालपण कदाचित त्याच्या वाट्यालाच नाही येत .....!!!
बाळा बाळा करत येईल आई
मऊ भात भरवायला, अंगाई गायला
परी तो नसेल घरट्यात
तो आहेच असं समजून देईल त्याला खायला ...
निमिषातच होतील डोळे टचकन ओले
क्षितीज देऊ लागेल आर्त साद ...
कसा असेल , काय करत असेल तो ?
काळजीने होतील कापरे तिचे मायाळू हात
पंखात बळ एकवटून
भरारी घेतली असेल बाळानं
'जिद्द' विजय मिळवते न्युनगंडावर
हे शिकवलं असेल काळानं
"जपून राहा रे ...
स्पर्धा आहे बाहेर खूप",
थकलेल्या बापाचे उपदेशाचे बोल आठवत
पाहत असेल जवळून त्या स्पर्धेचं रूप ...
पावसाच्या सरी अंगावर झेलत
घोंघावणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करत
लढत असेल तो करारानं
ठोकर खात का होईना ... असेल जगत...
प्रकाशाच्या दिशेने जाताना
खेचतील त्याचे पाय काळोखाचे दानव
पण तो नाही खचणार ... तो लढेल ...
जागा करेल त्या दानवातला मानव .....
जगेल तो तग धरून ...
प्रतिकुलतेतली अनुकुलता वेळीच ओळखून ....
अन परतेल त्याच्या घरट्याकडे
अपेक्षांच्या सिंहासनावर विजय मिळवून ....
असं घडतं ..... बऱ्याचदा ...... !!!
- विश्वजीत

No comments:
Post a Comment