ती सावली
नित्यनियमाने दर महिन्याच्या एखाद्या रविवारी रद्दी काढण्यास बसावा तशी मी बसले आणि खूप जास्त पेपर्स जमा झालेले, त्यातले लोकरंग आणि चतुरंग बाजूला काढले आणि सहजच वाचायला बसले. वाचता वाचता डॉक्टर संजय ओंक ह्यांच्या लोकरंग मधील 'जगात मनात' कॉलम वाचला आणि थक्कच झाले.. लेखाचा शीर्षक होतं दोन सावल्या आणि सुरुवातीला सरांनी लिहिलेलं की
एक सावली माणसाला पूर्णत्व देणारी , एक सावली त्याला अजिबात नको असणारी, एक सावली सुखद असत्य तर दुसरी दुखद सत्य .. एक सावली जीवन दुसरी मृत्यू ...
खरंच ह्या ओळी वाचल्यावर मनात एक प्रश्न उद्भवला की जगतो का आपण पूर्णपणे ?! To the fullest?! आयुष्याच्या कठीण वळणावर कळतं की काहीतरी करायचा राहून गेलं, कुणालातरी काहीतरी सांगायचा राहून गेलं, कुणाकडून काहीतरी ऐकायचं राहून गेलं, घेत घेत कितीतरी द्यायचा राहून गेलं...खरंतर जगायचंच राहून गेलं!!जगता जगता आपण किती खोटं बोलतो नं... मुखवटे घालून आयुष्य पुढे सरसावतो.. ह्या खोटेपणामुळे आपणच धडपडतो, आपल्याच मनात कुजतो, नाती-गोती जपायला सुरुवात होते.. मनातल्या मनात आपण खोटे असून जगाला आपण खरे असल्याचा मुखवटा घालून समाजात वावरतो. कोणे एके काळी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणणारे आपण भीत भीत जगतो. मग मनात विचार येतात जे आपल्यलाला भूतकाळात बांधून ठेवतात आणि भविष्यातही घेऊन जातात पण ह्या नादात वर्तमानाला न्यायच मिळत नाही. जगणं किती सुंदर असू शकतं ते आपल्याला दुसऱ्यांच आयुष्य वाचल्यावर, ऐकल्यावर, पाहिल्यावर कळतं. स्वतः स्वताचे मार्गदर्शक व्हायचं ते दूरच राहिलं! निर्जीव वस्तूत सुद्धा आत्मा असतो पण आपला आत्मा निर्जीव झालेला असतो...
आणि अशा एका कठीण वेळी ती सावली समोर येते जी प्रत्येकच आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने संधी साधून येते,जिचा आपल्या सर्वांना राग, तिरस्कार वाटतो ... मृत्यू... ती तिचं काम करत असते, आपल्या कामातून आपल्याला घेऊन जाते... death ...सून्न करणारी.. मृत्यूची चाहूल लागल्यावर आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते अचानक .. मग पुन्हा नाती जोडावीशी वाटतात... संपूर्ण आयुष्य एकट्याने चाललेलो असतो आपण, आत्ता कोणीतरी हवं असतं आपल्याला.. मग लक्षात येतं की तेव्हा सगळ्यांना घेऊन चालायला हवं होतं... सर्वांच्या चुका काढणारे आपण, आपल्या बाबतीत घडता तेव्हा बोट वळवतो .. ही सावली आपल्याला कवेत घेण्यास सज्ज असते.. आपण मात्र पुन्हा जगण्याच्या संधीच्या शोधात असतो ....
- अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - लाइट वर्डस)