Friday, March 27, 2015

अपेक्षांचं सिंहासन



                     असं घडतं बऱ्याचदा...की एखादं मुल ... घरची परिस्थिती एकदम बेताची असताना .... विशेष असं काही जमत नसताना .... फक्त आणि फक्त डोळ्यातली स्वप्नं, काही करण्याची जिगर, काहीतरी करून दाखवण्याची कमालीची भूक .... यांना सोबतीला घेऊन घराबाहेर पडतं... कदाचित काम करण्याचं वयही नसतं तसं त्याचं ....घरामध्ये असणाऱ्या त्याच्या आईबापाने आयुष्यभर मर मर कष्ट उपसलेले असतात .... आता त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलाने काहीतरी करावं ... या अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन तो बाहेर पडतो .... खेळण्या-बागडण्याच्या वयात, हसण्या-खिदळण्याच्या वयात त्याला काम करावं लागतं ... आपल्याला सगळ्यात छान वाटणारं बालपण कदाचित त्याच्या वाट्यालाच नाही येत .....!!!




बाळा बाळा करत येईल आई
मऊ भात भरवायला, अंगाई गायला
परी तो नसेल घरट्यात
तो आहेच असं समजून देईल त्याला खायला ...

निमिषातच होतील डोळे टचकन ओले
क्षितीज देऊ लागेल आर्त साद ...
कसा असेल , काय करत असेल तो ?
काळजीने होतील कापरे तिचे मायाळू हात

पंखात बळ एकवटून
भरारी घेतली असेल बाळानं
'जिद्द' विजय मिळवते न्युनगंडावर
हे शिकवलं असेल काळानं

"जपून राहा रे ...
स्पर्धा आहे बाहेर खूप",
थकलेल्या बापाचे उपदेशाचे बोल आठवत
पाहत असेल जवळून त्या स्पर्धेचं रूप ...

पावसाच्या सरी अंगावर झेलत
घोंघावणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करत
लढत असेल तो करारानं
ठोकर खात का होईना ... असेल जगत...

प्रकाशाच्या दिशेने जाताना
खेचतील त्याचे पाय काळोखाचे दानव
पण तो नाही खचणार ... तो लढेल ...
जागा करेल त्या दानवातला मानव .....

जगेल तो तग धरून ...
प्रतिकुलतेतली अनुकुलता वेळीच ओळखून ....
अन परतेल त्याच्या घरट्याकडे
अपेक्षांच्या सिंहासनावर विजय मिळवून ....

असं घडतं ..... बऱ्याचदा ...... !!!


                                                                                      - विश्वजीत




Thursday, March 26, 2015

असेचं काही ….

                                                                      असेचं काही ….
      बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुलं ही देवाघरची फुलं असं वाटतंय न ह्या चिमुकलीकडे  पाहून ! गोड, गोंडस वाटतंय न ! काही क्षणांसाठी आपणच लहान झाल्यासारखं वाटतंय ! काय  ही डोळ्यातली  निरागसता, काहीतरी बनण्याचं स्वप्न... खूप बोलतात हे डोळे... मला वाटतं आपल्या बहुतेकांची शाळेत अशीच पोझ असावी.. कधी आपली नजर  खिडकीतून बाहेर आकाशात विहरणाऱ्या पक्ष्याकडे असायची तर कधी तोच पक्षी कोणत्यातरी झाडाच्या कुठल्यातरी फांदीवर जाऊन बसेल ह्यावर तर कधी आपण आपल्याच विश्वात रमून बसलेले असायचो. तसेच हिचे डोळे.. तशीच क्युटशी स्माईल :)
  आता तुम्ही म्हणाल  किती गोड गोड लिहितेय मी आज, आता कुठे दिसत असं ही, कुणाला वेळ आहे असं काही बघण्यात किव्हा करण्यात ? प्राक्टीकल असावा माणसाने ! पण ह्यीच  practicality करताना, जगताना  आपण असं स्वस्थ मनापासून फार क्वचितच हसतो.. सतत चिंता, राग, गडबड, वेळ ह्यानेच व्यापले गेलो आहोत आपण.. खिडकीबाहेरच काय कॉम्पुटर च्या विंडो बाहेरच डोकवायला वेळ नसतो आपल्याकडे.. वेळच मिळत नाही असं वेळेला न विचारून सर्रास डीक्लेर करतो आपण... ह्या वाक्ल्याला खूप कॅजुअल्ली बोलतो आपण..  माग अशातून अबोला, दुर्लक्ष, कंटाळ आणि शेवटी गर्वाचा जन्म होतो..
               हळू हळू संवाद कमी  होतो , नंतर बंदच होतो आणि पुन्हा initiate करायला कोणच तयार होत नाही..माग मनमुराद साखोलीच बोलणं.. साखोलीच काय नुसता त्या व्यक्तीशी बोलणं इतिहास जमा होतं..एक वेळ तारे जमीन पर येतील पण हे सारे जमीन पर नाही अवतरणार...

                                                                                - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - आकाश दापले)

Friday, March 20, 2015

सखी

आज वपुंचा 'सखी' हा कथासंग्रह वाचून संपवला. खूप दिवसांनी वाचलं वपुंचं काहीतरी. आणि पुन्हा एकदा जणावलं की कोणी आवडता लेखक विचारल्यावर सगळ्यात आधी सवंतांबरोबर वपुंचं नाव मनात का चमकतं! वपुंचे शब्द जसे काळजाला भिडतात तसं आणि तितक्या ताकतीनं दुसरं काहीच नाही भिडू शकत. त्यांना 'माणूस' हा प्राणी अंतर्बाह्य कळला होता. मला न, वपुंची मानवी मनांची ट्रीटमेंट कांद्यासरखी वाटते. म्हणजे कांद्याचे जसे अगणिक थर असतात अगदी तसंच आपल्या मनाचंही असतं. आणि मग कथा हळूहळू पुढे नेताना ते हलकेच एक एक थर बाजूला करत जातात. वपुंच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला एक प्रकारची खोली असते; म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण डेप्थ म्हणतो. खूपदा मला आश्चर्य वाटतं की इतकी सगळी 'डेप्थ' असणारी माणसं एकाच व्यक्तीला कशी काय भेटू शकतात आणि ती पण एकाच जीवनकालात! पण मग वपुंच्याच शैलीत सांगायचं तर ती खोली, ती 'डेप्थ' समोरच्या माणसात नाही तर बघणाऱ्याच्या दृष्टीत असावी लागते. लेखकचं मन संवेदनशील असतं हे आजवर अनेक ठिकाणी वाचलं असेल तुम्ही. पण जेव्हा ती संवेदना डोळस असते, कोणत्याही मळभाशिवाय, तेव्हाच वपुंच्या पातळीचा लेखक होतो. कारण शेवटी दृष्टीच महत्वाची. खिड़कीच्या काचेवर जर धुळीचा पडदा असेल तर ना आतल्या माणसाला बाहेरचं काही दिसतं आणि ना बाहेरून घरात कोणी डोकवू शकत. लेखकाची पारदर्शक दृष्टी जशी समाजमनाचा अचूक वेध घेते तशीच ती त्याच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आरसा असते. वपु हे नाव लेखक म्हणून मोठं आहे की माणूस म्हणून हे ठरवणं खरोखर अवघड आहे. त्यांनी मला जी शिकवण दिली ती साधारण अशी आहे - माणसाचं मन म्हणजे महासागरासरखं असतं. सर्वसामान्य माणसं फक्त त्यात वर वर डुंबत राहतात. पण तुम्ही त्यात जितके खोल जाल तितकी आश्चर्यचकित करणारी रत्नं तुमच्या हाती लागत जातात; क्वचित एखादेवेळी हाती गरळही येतो. त्याच्या तळाशी असलेला खजिना आज पर्यंत कोणालाच गवसलेला नाहिये, पण जो अधिकाधिक खोली गाठून जास्तीत जास्त रत्नं आपल्या पुरचुंडीत जमवतो, तो खरा श्रीमंत!
-निकिता

Thursday, March 19, 2015

मी आणि तो

           
                 
                           माणसाच्या मेंदूमध्ये दोन बाजू असतात ..... एक डावी अन एक उजवी ..... डावी बाजू असते न ती आपल्या गणिती आणि तर्क वगैरे बाबींशी निगडीत असते अन उजवी असते ती कला , नवीन विचार यांच्याशी संबंधित असते . तसंच जर विचार केला तर असं जाणवत मला की माणसामध्येही अशा दोन वृत्ती असतात .... एक असते मी अन दुसरी असते तो  .... बऱ्याचदा असं घडतं की जो मी असतो न त्याला कोठे जायचं ... काय करायचं ठाऊकच नसतं... मग अशावेळी तो जो असतो न तो आपल्याला नेहमी मदत करतो ... आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो .... "मी" असतो तो बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी फक्त .... "तो" असतो आपलं अस्तित्व ... आपले अंतरंग अन बराच काही जे एका जन्मात तरी समजणं शक्यच नाही ... मी आणि तो जेव्हा एकमेकांशी बोलतील तेव्हा काय होईल ... मी काय म्हणेल त्याला ..... याबद्दल थोडेसे विचार ....!!!




तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार

अनंत अनंत रंगांचा
तू एक बोलका ठसा
कागदावरल्या नक्षीमधला
सुंदर एक पिसारा जसा

ती नक्षी तू पुन्हापुन्हा कोर
ते रंग तू जप ......
अगदी तळहातावरच्या फोडासारखे

जेव्हा माझ्यामधल कोलाज खदखदत असेल,
तेव्हा तू पेटून उठ ......
मरगळलेले पाश तोड,
त्या कोरीव नक्षीमधले गोल जोड.....
गुदमरणाऱ्या डोहातल विष पिऊन टाक.....
भीतीचं कोडं निर्भीडपणे सोडवून काढ ......

पुन्हा एकदा नेहमीसारखं
कर स्वतःला सिद्ध
जाणवू दे सर्वांना
तुझं अस्तित्व .... माझ्यातलं.....

पुन्हा ठरशील मग तू
माझ्यातला सर्वोत्तम अलंकार
टिकवून ठेवशील तुझ्या - माझ्या
साऱ्या खुणा चिरकाल .....

नेहमीसारखं आजही तू
माझ्या जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार .....

तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार
फक्त दे माझ्या
मातीच्या गोळ्याला आकार

                             
                                                                                    - विश्वजीत



Wednesday, March 18, 2015

Abstract

                                                                       
                         शीर्षक सारखा मी आज abstract बोलणारे ... ह्या खाली दिलेल्या  चित्राकडे  बघा ..सुंदर, लक्षवेधी, छानसं चित्र.. रंग कुठलेही वापरले असले, कोणतेही  रंग उधळले असले तरी चित्राची ठेवण मात्र तीच राहतेय .. ब्युटीफुल स्प्लाश ऑफ कलर्स , ग्रसफुल पेंटिंग ! आपल्या मनाचा  एक ग्रह झालेला असतो की फुलांचा रंग नेहमी पांढरा, निळा, गुलाबी, केशरीच  असतो..पण ह्या पेंटिंगकडे पाहून किती फ्रेश वाटतंय , जणू ह्या फुलांना अश्या रंगांनी एक वेगळाच अस्तित्व लाभलाय...वेगळ्या रंगांची उधळण झालेली दिसली तरी ह्या फुलांचा अस्तित्व मात्र टिकून आहे.
                        आपण  ह्या फुलांच्या रंगानसारखं  खूप काही गृहीत धरतो. कधी कुणाचा बोलणं, कधी कुणाचा वागणं आणि कधी कधी तर आपल्या माणसांनाच गृहीत धरतो.. ह्या कोमल फुलांवर होणाऱ्या रंगफेकीप्रमाणे शब्दांची भाडीमाराचीआवाजाची उधळण आपल्यावरही होत असते...त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न आपआपल्या पद्धतीने करत असतो आपण.. केव्हा केव्हा तर ही होळी इतका तीव्र असते की त्यातून बाहेर पडणे जर कठीण होऊन बसते... ह्या चित्रातील बाहेर आलेला माणसाचा पाय बहुतेक तेच सांगत असावं...रंगात रंगायचं पण इतकंही नाही की तो  रंगच उतरणार नाही...
                            रंगांच्या शेड्स प्रमाणे माणसालाही वेगवेगळ्या छटा असतात.. कधी फिका, कधी मध्यम तर कधी गडद.. रंग आकाराला घडवतो पण महत्वाचा म्हणजे रंग पार्श्वभूमी सजवतात...कुठलीही गोष्ट  पार्श्वभूमी शिवाय पूर्णच होत नाही, खरंतर गोष्टी पार्श्वभूमी शिवाय सुरूच होऊ शकत नाही... आपण आणि आपला जीवनही असच एका मोठ्या कॅनवासवर केलेलं "Abstract " आहे...छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा बनत जाणारं ...

                                                                                           -अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमेगेस)

Tuesday, March 17, 2015

मुंबईचं स्पंदन .....

अजून दोन महिन्यांनी engineering संपेल, आणि त्याच वेळी मुंबईत पहिल्यांदा पाउल टाकूनही चार वर्ष पूर्ण होतील जवळपास. आय. सी. टी. मध्ये प्रवेश घेताना मुंबई, आमचं कॉलेज, हॉस्टेल सगळ्याच बद्दल मनात एक प्रकारचं कुतूहलही होतं आणि जरा धाकधूक पण. माझ्यासाठी सगळंच नविन होतं. सुरवातीला कितीतरी दिवस कळायचंच नाही हॉस्टेलवर फावल्या वेळेत काय करावं ते. मग त्यावेळी जरा हाताला आणि मनाला चाळा म्हणून बरंच काही लिहून काढलेलं मी. अर्थात त्यातल्या बऱ्याच कविता अगदी शाळकरी पातळीच्या आहेत. पण मुळातच कविता मला कधी फारशी जमलीच नाही. कविता आपसूकच स्फुरावी लागते, बळजबरीनं नाही करता येत. त्यामुळे मला नेहमी सुचलं, जमलं ते म्हणजे गद्य; पद्य जरा रुसलेलंच असतं माझ्यावर!

आत्ता चार वर्षांची रद्दी काढताना हातात पडलं सगळं. आणि रद्दी आवरायची सोडून तेच वाचत बसले मी … एक गोष्ट लक्षात आली; माणसाचं कसं वय वाढतं, तसंच त्याच्या लिखाणाचं पण ते वाढत असतं. पहिल्या वर्षी मुंबईच्या 'लोकल'वर लिहिला एक लेख आहे. आपलं असा बऱ्याचदा होतं न की आपणच लिहिलेलं वाचून आपल्यालाच प्रश्न पडतो की हे खरंच आपणच लिहिलंय का …. अगदी तसंच वाटतं मला हा लेख वाचून.

तशी प्रस्तावना फार लावली मी. आता तुम्हीच वाचा आणि ठरवा!

'वेळ संध्याकाळची … हातात लेखणी … लिहिण्याची हुक्की आली म्हणून काहीतरी लिहिण्यासाठी पुढ्यात पानं घेऊन बसलेली मी … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून धडाडत जाणाऱ्या लोकलचा आवाज, बंद खिडकीला न जुमानता आत शिरतो … मुंबईच्या हृदयाचं ते स्पंदन काळजाला साद घालतं … आणि असा वाटून जातं की दिवस-रात्र, आठी प्रहर अव्याहत चालणाऱ्या या मुंबईची जीवन-वाहिनी जर कुठली असेल तर ती आपली लोकल-ट्रेन … रोज आपल्याला आपल्या इष्ट स्थळी पोहचवणारी, आणि कळत-नकळत आपल्याला बरंच काही शिकवणारी …

मी मुळात नाशिकची. त्यामुळे लहानपणी कधीच लोकलशी संबंध आला नाही. हो, पण माझा पहिला लोकल प्रवास मला कायमच लक्षात राहील; कारण आपली पुरती फजिती झालेले प्रसंग माणसाला काही केल्या विसरता येत नाहीत! अकरावीत आम्ही आय. आय. टी.चा प्रौद्योगिक महोत्सव बघायला मुंबईत आलेलो. तोपर्यंत लोकलचा प्रवास काही आमच्या वाटेला आला नव्हता. तिकिट काढून आम्ही फलाट ओलांडून पूल उतरलो, तर समोर आम्हाला हवी असलेली लोकल येऊन उभी राहिली. नेहमीच्या सवयीने आम्ही रमत-गमत लोकलकडे सरकू लागलो. जेव्हा मी चढण्यासाठी हँडलला हात लावला, तेव्हा लोकल सुरूही झाली की हो! आणि माझ्यामागे सगळ्या चढायच्या बाकी! मग कशीतरी हाश-हुश करीत ती चालू लोकल पकडली! लोकल स्टेशनवर फारतर अर्धा मिनिट थांबते. हे तेव्हा आमच्या गावीही नव्हतं! त्यादिवशी पहिल्यांदा मला 'अर्ध मिनिट' किती महत्वाचं असतं याची प्रचीती आली. हा लोकलने मला शिकवलेला पहिला धडा होता!

तेव्हापासून आजपर्यंत मी अनेकदा लोकलने प्रवास केला. गर्दी लोकलला नवी नसली, तरी मला लोकल नवी होती! आणि हळूहळू असं कळलं की डोळे आणि कान उघडे ठेवले की ही गर्दी बरंच काही शिकवून जाते … कधी दहा मिनिटांच्या प्रवासातही मोबाईल वरून सहकाऱ्यांना सूचना देणारा साहेब दिसला, तर कधी भर गर्दीत स्वतःचा तोल सांभाळत, एका हातात पुस्तक घेऊन वाचणारा कष्टाळू विद्यार्थी पहिला. कधी माझ्या शेजारी सूट-बूट घातलेला चकचकीत व्यावसायिक होता तर कधी मळकट कपड्यातला, आंधळेपणाला काठीचा आधार देत, गाणं गाऊन पोटासाठी पैसे मागणारा भिकारी पुढ्यात उभा असे. मी जागेसाठी कडाकडा भांडणाऱ्या काकूही पहिल्यात आणि आपणहून उठून माझ्यासाठी जागा करून देणारे काकाही. स्पर्शासाठी आसुसलेल्या गलिच्छ मनोवृत्तीचाही अनुभव मी घेतलाय …

पण लोकलने मला दिलेला सगळ्यात मोठा अनुभव अगदी वेगळा आहे … नात्यांना घट्ट बांधणारा … इथे आय. सी. टी.त प्रवेश घेतल्यावर माझे शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी मला भेटायला पहिल्यांदा आले होते … आम्ही मरीन-ड्राईव्हला जायचं म्हणून माटुंगा स्टेशनला गेलो … तिथे गेल्यावर कळलं की मध्य रेल्वेला मेगाब्लॉक होता. त्यामुळे आम्ही वेस्टर्ननं दादरला जायचं ठरवलं … आम्ही सगळे एकत्रच चढणार होतो, पण लोकलमधली गर्दी पाहून मी आणि माझी मैत्रीण लेखा अखेरच्या क्षणी पळत पळत महिला डब्यात चढलो … तिथे उभं राहिलाही जागा नव्हती … आम्ही अक्षरशः दरवाज्यात लटकून उभं होतो … दादर जवळ येऊ लागलं, तशा बायका उतरायला मिळणार नाही म्हणून धक्का-बुक्की करू लागल्या … स्टेशन लागलं तेव्हा कानावर आलं की मागच्या डब्यातली एक मुलगी रुळावर पडली … कसातरी आम्ही आमचा जीव त्या गर्दीतून फलाटावर उतरवला … इकडे आमच्या मित्रांनी त्यांच्या डब्यात एवढंच ऐकलं की कोणी एक मुलगी रुळावर पडली. त्यात माझा एक अतिशय जिवाभावाचा मित्र, मित्र नव्हे भाऊच, हिमांशू होता. ते उतरताच आम्हाला शोधायला आले. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा हिमांशुच्या डोळ्यात पाहिलेली भावनांची रंगपंचमी मी सात जन्मात विसरणार नाही … आधी पोटतिडकीची काळजी, मग आम्ही सुखरूप आहोत हे कळल्यावर हळूहळू झिरपलेला आनंद … शब्दांत नाही मांडता येणार व्यवस्थित … पण मला असं वाटलं की मला सख्खा भाऊ असता तर इतकाच घाबरला असता कदाचित …

कधी गोड, कधी कडू … बरेच अनुभव दिले लोकलने. असंख्य मनोवृत्तींची माणसंही पाहायला मिळाली … खूप शिकवलं … पण वाटतं, अजून शिकायचंय, अजून जग अनुभावायचय … तेवढ्यात हॉस्टेलच्या मागून दूसरी लोकल धडाडत जाते आणि लक्षात येतं, की घाई काहीच नाहीये … अजून कमीत कमी साडेतीन वर्ष रहायचय मुंबईत … !!!'

-निकिता   

Saturday, March 14, 2015

माणसं

                                                                   माणसं
        समाजातला एक जीवंत घटक , खरंतर समाजाला जीवंत करणारा घटक . काही सारखे ,काही भिन्न, काही हुशार , शहाणे, काही खूप प्रेमळ तर काही कटकटी :p  प्रत्येकात एक न एक वेगळा गुण असतोच, एक कला असते, एक छंद असतो ज्याचा गंध कधी सरळ पसरतो तर कधी त्या गंधांची शाखा होऊन सर्वत्र  पसरतो...
         काही माणसं वेगळीच असतात , त्यांचा प्रत्येक गुण बघणं आपल्यासाठी एक सोहळाच असतो जणू .. आता हेच बघा न, दुसऱ्यांना समजावणारी , दुसर्यांच्या  मनातला ते सांगण्याआधीच जाणत असणारी...किती छान वृत्ती आहे न ही... न सांगता, न बोलता त्यांना आपली मनस्थिती  अलगद उमजते...जणू आपला आरसाच असतात ती.. दर्पणात कसा आपल्याला आपण दिसतो तसाच त्यांच्या दर्पणरुपी मनात आपल्याला आपण दिसतो :)
           चांगल्या वृत्तीची मनाला भावणारी खूप लोक भेटतात, काहींशी संवाद वाढतो , पुढे  मैत्री वाढते, काहींशी तिथला तिथेच राहतो तर काहींशी थोड्या काळानंतर पुन्हा जुळून येतो ... एका विशिष्ट ग्रुप ऑफ पीपल चं मला जाम अप्रूप वाटतं, अलग कलात्मक असतात राव ती.. सर्वच जमत त्यांना..सर्वगुणसंपन्न   हट्स ऑफ टू धेम ...  काही हुशार  , ज्ञानी, काही दानी, कर्तृत्ववान ..अलंकार असतात अशी माणसं समाजासाठी..
            काही माणसांच्या कलेत  रंगून जावस वाटतं, ज्ञानातून वाट काढावीशी वाटते, त्यांच्या कर्तृत्वात आपणही दैदिप्यमान व्हावासा वाटतं.. हं पण त्यासाठी नुसता वाटण्यापेक्षा "कृती" करावी लागणारे. काही सोपे पण महत्वाचे बदल केले पाहिजेत  आपण आपल्यात . आता ते नेमके कोणते ते प्रत्येकावर  आहे. माणसामाणसात भिन्न गुण असतात तसच ते बदल कोणत्या स्वभावात, कोणत्या गुणात करावे ते ही वेगळे असतात. विचार करा नक्की सापडेल :)
                             
                                                                                                             - अपूर्वा  :D

       

लहानगा



मोठं होता होता बऱ्याचदा लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात ..... कितीही मोठे झालो तरी पुन्हा लहान होण्याची इच्छा जाग्या करतात .... लहानपणी कसं एकदम छान अलबेल होता असं वाटू लागतं मनाला ... मन म्हणू लागतं मग ... " लहानपण देगा देवा " ......आणि सांगू लागतं आपल्याला ..... " तू पुन्हा लहानगा व्हावं " .........

निसुर पठाराने
पुन्हा गुलाबी थाट घ्यावा
अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा एकदा लहानगा व्हावा"

चौफेर उधळणाऱ्या प्रश्नांनी
पुन्हा धावत्या पाण्याचा वेग घ्यावा
चक्रावलेल्या नजरेनं
इंद्रधानुश्यातल्या रंगांचा मागोवा घ्यावा

पाणावल्या डोळ्यांनी बापाकड
फिरायला न्यायचा हट्ट करावा अन
फुलांचा राजा गुलाबच का ???
सुर्यफुल का नाही !!! असं वेडा प्रश्न करावा

घोडा घोडा म्हणून सहजच
"मोत्या"च्या पाठीवर "स्वार" व्हावं
आणि घोड्यावर बसण्यापूर्वी मात्र
आईच्या पदरामागे जाऊन लपावं

बोळातल्या त्या कोपऱ्यात पुन्हा
गोट्या-लगोरीचा खेळ रंगावा
वर्गात शेवटच्या बाकावर बसून आजही
तुफान धुडगूस घालावा

गेलेल्या वेळानं दाहीदिशा
सर्वस्व पणाला लावून शोधावं
अन लहानपणीच्या गोंडस आठवणींना
काळाच्या विस्तीर्ण पडद्यावर मांडावं

वयाचं गणित आणि काळाचा ताळमेळ
साफ साफ चुकावा
अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा लहानगा व्हावा"

अन मन सांगे ओरडून
"तू पुन्हा लहानगा व्हावा" ....

लहानपण हे माणसाच्या आयुष्यातलं खूप मोठ्ठ लेणं आहे . लहानपणीचे बरेच फोटो वगैरे असतील .... पण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आठवणी या त्या फोटोस मध्ये बसण्यासारखा नव्हत्या .... कधी बसूही नाही शकत ...पण ते जगलेले क्षण, त्या जगलेल्या आठवणी याच चिरकाल आपल्यासोबत असतात ... आपल्यासोबत राहतात ... हीच किमया आहे लहानपणाची .... आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या लहानपणाची .....


                                                                                                            -विश्वजीत



Friday, March 13, 2015

नमस्काराचा उपचार !!!

नमस्कार मंडळी …….

आज-काल 'नमस्कार' वगैरे सारखे शब्द जरा कमीच कानी पडतात नाही का ! आता रुजलेली पद्धत म्हणजे 'hi guys ... how's life?' अर्थात मी पण बहुतेकदा अगदी हेच उद्गार काढलेले असतात कोणाला भेटल्यावर. पण ओसाड माळरानात चालता चालता अचानक पाण्याचा नितळ झरा नजरेस पडावा तसं कधीतरी कॉलेजची 'सांस्कृतिक मंडळी' भेटतात आणि 'नमस्कार'चं संबोधन कर्णसुख देऊन जातं. मग अवचित कधी तिथं त्या घोळक्यात जरा रेंगाळण होतं; अर्थात या engineering मधून जरा जरी वेळ मिळाला तर! मग सहाजिकच गप्पांना तोंड फुटतं. कोणी नुकताच पाहिलेल्या चित्रपटाबद्दल सांगता, कोणी आत्ताच वाचून संपवलेल्या पुस्तकाचं रेडीमेड विवेचन पुरवतं. कधी-कधी अगदी काहीच खास विषय नसतो पण तास दोन तास कधी गेले हे कोणालाच समजत नाही. अचानक कोणाचा तरी फोन वाजतो आणि सगळ्यांनाच आपल्या तुंबलेल्या कामाचं स्मरण होतं. आपण नेहमी भेटत राहायला हवं, अशा गप्पा कायम व्हायला हव्या अशी इच्छा सगळेच व्यक्त करतात; तसं वचनही देतात एकमेकांना. आपलं मराठीपण जरा जपल्याच्या समाधानात प्रत्येक जण असतो. पण त्यानंतर तसाच योग परत जुळून यायला चांगले तीन-चार महिने उलटून गेलेले असतात. 

दरम्यानच्या काळात मनात बरंच काही खलत असतं, अनेकदा विचारांचं वादळ मेंदूत थैमान घालतं. पण ते व्यक्त करायला एक तर वेळ नसतो नाही तर माणूस. आणि असे विचार जेव्हा आपण दाबून टाकायला लागतो न तेव्हा आपलं मन हळू हळू बोथट, असंवेदनशील होऊ लागतं. शरीराप्रमाणेच मग मनही आजारी होऊन जातं. 

या विचारानं मन अस्वस्थ झालं माझं. आणि यावर उपाय सापडला तो म्हणजे लिखाण. मला वाटतं समोरच्याला समजायला सोप्पं जाईल अशा रितीनं व्यक्त व्हायला लिखाणासारखं दुसरं साधन नाही. आणि त्याच्या उद्देश जर फक्त व्यक्त होण्यापलीकडे जाऊन माणूस जोडणं असा ठेवला तर त्यातून अतिशय सुंदर आणि उदात्त आविष्काराची निर्मिती होते. 

अशाच काही गप्पा, काही विचार घेऊन आम्ही तुमच्या भेटीला वेळोवेळी येत जाऊ. या व्यासपीठावर मी, निकिता आवारे, आणि माझे दोन सवंगडी अपूर्वा तायडे आणि विश्वजीत पाटील आपले विचार तुमच्याशी share करणार आहोत. आणि हो … अगदी काही अवघड, अवजड मराठी किंवा फक्त मराठीचाच अट्टाहास असा काहीही तुम्हाला आमच्या blog वर दिसणार नाही, कारण मनं जोडायला फक्त भावनाच पुरेशा असतात !!!

मात्र तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यात आळस मात्र करू नका हा … हा संवाद घडावा आणि उत्तरोत्र रंगत जावा हीच शारदाचरणी प्रार्थना ……