Saturday, August 27, 2016

सुसंवाद


आज खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता त्यांना. निवांत म्हणजे दोन नोकरदार मुंबईकरांना आठवड्याच्या दिवशी जितका निवांत मिळू शकेल, तितका निवांत. पुणेकरांना रोजच दुपारच्या जेवणानंतर मिळतो तसा नव्हे! असो ... तर दोघांनाही आज ऑफिसमधून लवकर सुट्टी मिळाल्यामुळे हा योग खरंतर जुळून आला होता, आणि मग आपसूकच त्यांची पावलं वळाली ती मरीन ड्राईवच्या दिशेनं.

ते तिथं पोहचले तेव्हा ऊन तसं उतरायला लागलं होतं. चौपाटीवरून एक भेळेचा पुडा त्यांनी बांधून घेतला आणि समुद्राकडे तोंड करून मरीन ड्राईवच्या त्या कट्ट्यावर बसले. मागे एकदा ती त्याला म्हणाली होती ... “मला न हा कट्टा म्हणजे एक boundary वाटतो. सीमारेषा ... मुंबई आणि समुद्राच्या मधली, शहर आणि निसर्गामधली, कोलाहल आणि शांततेमधली. म्हणजे बघ ना, एकदा समुद्राकडे तोंड करून इथे बसलं, की तुझ्या पाठीशी अख्खी मुंबई असते. अव्याहत धावणारी, कधीही न थांबणारी; व्यस्त मुंबई. पण तरीही, एकदा समुद्राकडे तोंड करून बसलं की अंगावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या, किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटांच्या लयीत हरवायला झालं, की बटन दाबून बंद केलेल्या रेडिओ सारखं मुंबईचा आवाज बंद होतो. लोक म्हणतात खूप वेळा, ‘कंटाळा आलाय आयुष्याचा. कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जावून बसावं शांतता शोधायला.’ पण मी म्हणते गरजच काय त्याची ? इथे तेच तर मिळतंय तुम्हाला. आणि खरं म्हंटलं तर इथे बसलो तरी मुंबईतच आहोत आपण; पण तरीही मुंबईत नाही. फक्त दिशा बदलली की संदर्भ बदलला. शिवाय समोर दिसणारा समुद्र खूप सुंदर, निळाशार दिसतो, मनाला भुरळ घालणारा असतो असंही नाही. पण जे आहे, जसं आहे ते त्या क्षणापुरतं खरं असतं, सुंदर असतं, निवांत असतं ... आणि हीच खरी जादू आहे इथली.”

तिचा हा dialogue आठवला तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. फिल्मी वाटतं आपल्याला वाचून, पण त्याला सवय होती. आता लेखीकेबरोबर असायचं म्हणजे अशा विधानांची म्हणा, अशा संवादाची सवय लागणं हे साहजिकच होतं. पण काही वेळेस फक्त ऐकून भागेलच असं नाही. त्यावर तिला त्याची प्रतिक्रियाही हवी असायची. तोही मग प्रयत्न करायचा. आणि म्हणूनच, ती भेटल्यापासून त्याची विचार करायची क्षमता, पद्धत खूपच सुधारली होती. तिच्याबरोबर प्रत्येक क्षणाला त्याला काहीतरी नवं शिकायला मिळत होतं. नेमकं हेच त्याला तिच्याबाबतीत सगळ्यात जास्त आवडलं होतं. खूप मनापासून enjoy करत होता तो त्यांचं नातं.       

नेहमीप्रमाणे सुरवातीला चाललेली तिची अखंड बडबड त्यानं व्यवस्थित ऐकून घेतली. मग मग जसा जसा सूर्य क्षितिजाकडे झुकू लागला तसं तसं तिचं बोलणं कमी होत गेलं. आणि त्याचा हात हातात घेऊन तो सूर्यास्त पाहताना, सगळे शब्दच जणू त्या सूर्याबरोबर मावळून गेले. समुद्राची शांत करणारी गाज ऐकत जवळपास अर्धा तास ती दोघं तशीच बसून राहिली. जशी तिच्या बडबडीची सवय होती, तशी तिच्या या शांत बसण्याची, अंतर्मुख होण्याचीही होती. त्याला माहित होतं, ही शांतता वरवरची आहे, त्या समोरच्या समुद्रासारखी. आत खूप काही चालू असतं तिच्या. आणि मग विचारांच्या त्या प्रवाहाला गती मिळाली की किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांसारखे आपोआपच ते तिच्या ओठांवर येतात. आणि मग अचानक ती बोलली ...

“मला सांग, कधी उन्हाळ्याच्या रात्री, गच्चीवर बसून निवांतपणे चांदण्या मोजल्या आहेस तू? बसनं प्रवास करताना खिडकीतून दिसणारा चंद्र बघितलाएस तो दिसेनासा होईपर्यंत? कोणाशी तरी खूप बोलायचंय म्हणून तुम्ही समुद्रावर जाऊन बसलात आणि तिथं गेल्यावर मात्र संपूर्ण वेळ फक्त वाऱ्याची गाज ऐकत बसलात, आपण आत्ता बसलोय तसं ... असं झालंय कधी? तू trekkingला जातोस नं? अख्खा दिवस घाम गाळून, डोंगर चढल्यावर शेवटी जेव्हा कळसावर पोहचतोस तेव्हा काय वाटतं तुला?”

“अवघा निसर्गच माझ्याशी बोलतोय, असं काहीसं ...”

“हीच तर खरी गम्मत आहे अरे! निसर्ग मुळीच बोलत नसतो. आपणच बोलत असतो आपल्याशी! आता चांदण्या रात्री आपण जी शीतलता अनुभवतो ती काही चांदण्यांची असते का? तारका म्हणजे अग्निलोळ आणि त्या अर्थी त्यांचा धर्म तेजाचा ... मग आपल्याला जाणवणारा गारवा कुठून येतो? तो मनातच असतो आपल्या ... आपल्याच मनातला एक थंडगार कोपरा आपल्याला गवसलेला असतो त्या कौमुदी प्रकाशात ... चंद्राचंही तसंच ... त्याच्या त्या मोहवणाऱ्या मुद्रेत आपलंच प्रेम परावर्तीत होत असतं ... समुद्राच्या लाटांच्या गाजेत आपल्या विचारांची कंपनं असतात ... आणि डोंगरमाथ्यावरून जाणवणारी निसर्गाची भव्यता ही आपल्याच अंतरंगाची व्याप्ती असते ... आपल्याला वाटतं की आपल्याला जाणवणाऱ्या positive waves हे निसर्गाचं देणं आहेत. पण तो उगम नाहीये. त्याचं काम फक्त पाऱ्याचं, दर्पणाचं आहे. काहीसं amplifier चं ... पण जे काही असेल; कोलाहल, शांतता, प्रेम ... सगळं काही आपलंच असतं. निसर्ग फक्त ते आपल्याला शोधायला मदत करतो. आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या सानिध्यात कोलाहलातली शांतता आणि शांतातेतील कोलाहल, दोन्ही समजून घेता येतं. आणि मग आपण म्हणतो, ‘इथे आलं की एक प्रकारचं peace of mind मिळतं यार ...’ शेवटी हे peace of mind म्हणजे तरी काय असतं अरे ... आपला आपल्याच मनाशी चाललेला सुसंवाद ... शब्दहीन ...”

तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला जेव्हा पूर्णपणे उमगला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मघाच सारखं एक अर्थपूर्ण हसू उमललं. इतका वेळ त्याला वाटत होतं ती त्याच्याशी बोलतेय. पण तीच म्हणाली तसं, हा संवाद त्यांच्यातला नव्हताच मुळी. ती आत्ता सुद्धा आपल्याच मनाशी बोलत होती ....


-    निकिता        

Tuesday, June 14, 2016



अशी माणसे येती!
             स्पृहा जोशी ची प्राजक्तही कविता मला खूप आवडते आणि जाणीव होते कि प्राजक्ता सारखी नाजूक, निर्मळ सुंदर गोष्टी, अनुभव, भावना, वस्तू ह्याचं ही आयुष्यात स्थान आहे. गुलाबाकडे विशालता असून सुद्धा काही माणसं प्राजक्ता सारख्या गोष्टींकडे वळतात. ते मोठे अवाढव्य नसले तरीही त्यात कोमलता, नाजुकपणा असतो आणि मुख्य म्हणजे ती त्या व्यक्तीची निवड असते.
माणसांना जाणून घेण्याचा आनंद वेगळाच असतो. काही माणसं नं वेगळंच असतं… त्यांच्याकडे सगळं असून देखील केवळ दुसऱ्यांच भलं व्हावं म्हणून झटत असतात...अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण असून सुद्धा दुसर्यांच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरुच असते. मग ते सध्या बोलण्यातून असो, अथवा शिकवण्यातून, आणि ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता. अत्यंत निरपेक्ष भावनेने आपल्या ज्ञानामृतचा, अनुभवामृतचा ठेवा लोकांना देत असतात. रक्ताच्या नात्या पलीकडची नाती असतात ही! खरंच समृद्ध असतात अशी माणसं आणि आपल्याला समृद्ध करतात!
जितकी प्रेमळ असतात अगदी तितक्याच हक्काने चुका सुद्धाही मोठ्या तत्परतेने सांगतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखा खूप असतं. प्रत्येक गुणातून सदैव प्रेरणाच मिळत असते. एक उत्तम आणि well balanced व्यक्तीच असतात जणू! खरंच अशा माणसांच्या गुणांच्या नखाची सर जरी आम्हाला लागली तर आयुष्य सार्थकी लागल्याची धन्यता मिळेल.
स्वतःवर पूर्ण विश्वास असला की अख्ख जग जिंकता येत हे ते खात्रीपूर्वक सांगतात. गुरु, मित्र, तत्वज्ञ, दिशादर्शक अशी सगळीच रूपे त्यांच्यात एकत्र बघायला मिळतात ज्यांच्या बद्दल अप्रूप वाटणं चुकीचं ठरणार नाही. ह्या पृथ्वी वरील rare species मधील आहे ही जी आपल्या अनुभवाची, ज्ञानाची शिदोरी दुसर्यांच्या हितासाठी उघडतात.
ज्यांना किती ही धन्यवाद म्हटलं तरी पुरणार नाही असं योगदान असतं त्यांचं आपल्या जीवनात.
 आयुष्याच्या साठवणीतील आठवणीची माणसं!
- अपूर्वा

Friday, February 26, 2016

कोलाज


एक निवांत संध्याकाळ ....
बसारीमधून ऐकू येणारे आर्त स्वर ,
त्यातच घुमणारा तबल्याचा ताकधीनचा आवाज,
चहूकडे दुमदुमलेली तीन तालाची पकड

आणि....
अशाच निवांत क्षणी
तुझ्या अंतरंगातील अनंत रंगांनी रंगलेल्या भावना
त्या कॅनव्हास वर शिंपड ....

ज्याप्रमाणे सागराच्या तळाला मोत्यासारखे रत्न
निर्माण करणाऱ्या शिंपल्याला
कर्णशिलांजवळ नेउन धरलं
तेव्हा सागराचा जसा निनाद ऐकू येतो
तसंच अगदी तसंच
त्या शिंपडलेल्या  भावनांना हृदयाजवळ घट्ट धर ....
तोच तुला असं जाणवेल ....
की .... ती जणू तुझी प्रतिमाच आहे
जणू तुझं दुसरं अस्तित्त्वच आहे ....

तुझ्या शुद्ध स्वरूपातल्या मनाचे, बुद्धीचे, नीतीचे,
मतिचे, गतीचे ,विचारांचे आणि आचारांचे ....
ते कोलाजच आहे जणू.....
त्या कोलाजातील सुंदर दिसणारे
आणि कांतीने झळाळणारे ठिपके जोड
स्वतःला त्यामध्ये गुंतवून घे, समरसून घे
आणि जग .....

त्या कॅनव्हासवर तुला हव्यानाकोश्या
साऱ्या भावना शिपड आणि जग .... फक्त जग .....



- विश्वजीत 

Saturday, October 10, 2015

गंध मातीचा

खूप दिवसांनंतर ब्लॉग वर काहीतरी लिहायला वेळ मिळाला (काढलाच म्हणा) .... अचानक आलेल्या शिथिलतेचा इथेच खंड करून नवीन उर्जेने पुनरुज्जीवन करण्याचा आमचा मानस आहे.

ही कविता आपली माती, आपली नाती, आपली माणसं या सर्वांना अर्पण. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्फूर्तीला सलाम. काळाच्या ओघात पुढे जात असताना काही मुलभूत प्रश्न मांडण्याचा आणि त्याद्वारे माणुसकीच काय होईल  याचा आपण सर्वांनीच विचार करणे क्रमप्राप्त आहे.

  
स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

हृदयाला धडधडण
याच्या पलीकडंही
खूप काही ठाऊक असतं
जाणीवेचा प्रतिबिंब
असतं हृदय ... हे आता
समजावेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

बीजाला पेरण
खतपाणी देणं
फुटलेल्या अंकुरची
जीवापाड काळजी घेणं
या जगात हे सारं
शिकवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सारंकाही ठीकठाक
म्हणता म्हणता
अचानक्तेचा गौप्यस्फोट
होता होता
सावध राहण्याची गरज
सांगेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जगणं दुसऱ्यांसाठीच
बाळकडू देणारं
"स्व”तःच्या खिडकीपलिकडच
नयनरम्य दृश्य पाहण्याचं
प्रवाह विचारांच्या अशा
टिकवेल का कोणी...
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

जन्माचं कारण
शून्याचा उगम
अस्ताच प्रारब्ध
उलगडणारी रहस्य
आता उलगडेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

सजीव असण्यामागच
प्रेम करण्यामागच
मायेच्या ओलाव्याने
जवळ घेण्याचं
गणित सोडवेल का कोणी
अन गंध मातीचा
जपेल का कोणी ?

स्पंदनांची बाजू
मांडेल का कोणी
अन गंध मातीचा

जपेल का कोणी ?


           विश्वजीत




Sunday, October 4, 2015

"गर्दी"श में तारे

                                                                    "गर्दी"श में तारे
कधी कधी प्रश्न पडतो - गर्दी बरी का एकांत?! गर्दी, गोंधळ, गडबड असतच आजूबाजूला. ती असल्याशिवाय काम पुढे जात नाही आणि हल्ली तर वेळही नाही! ते म्हणतात नं कुठलीही गोष्ट, व्यक्ती, वस्तू नसली तरचं त्याची किंमत जाणवते, ते अगदी खरं आहे. शांततेच्या गावी गर्दीचे सूर गवसतात आणि गर्दीत असताना स्तब्धतेची आठवण होते. आज अचानक आजूबाजूला स्मशान शांतता जाणवतेय !
आणि अचानक ध्यानी येतं की नकळत सवय लागली आहे आपल्याला गर्दीची, गर्दीतल्या माणसांची आणि माणसांच्याही गर्दीची. गणपती आले आणि गेले, काल पाऊसही येउन गेला.. त्यामुळे परत कोरड पडली आहे. ओलावाही नाही आणि भावनाही ...मग कुठूनतरी धाडकन आवाज येतो कसलातरी...तात्पुरता नकोसा वाटतो पण मौन धारण केल्यावर आपणही गप्प बसतो!!!
मध्यरात्री किव्हा भर पहाटे गडबड जास्त नसल्याची जाणवते आणि अचानक खूप काही गोष्टी डोळ्यासमोर आणि मनात तरंगू लागतात...  मनाने वाट मोकळी करून द्यायची ठरवली तर किती मार्ग असतात नं !
 आपल्यला आवडत असो वा नसो, पण गर्दी खूप काही शिकवते माणसाला! स्टेशनला ब्रिजवर गर्दीत मधेच उभी किंव्हा खाली बसलेली म्हातारी, तिचे पाणावलेले डोळे, पसरलेले हात, केवीलवाणी नजर, सुरकुत्या पडलेलं कृष, अशक्त शरीर.... कसं जगायचं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं झेलायचं, कसं  बोलायचं हे शिकवतो  गजबजाट... समाजाला जिवंतपणा देण्याचा काम गर्दी देते. आवाजाने घेरलेल्या "आपल्याला" आयुष्यभर प्रत्येक क्षणी ती असावी आसपास असावी असं वाटतं. ह्या कोलाहलात सकाळ कधी होते कळतच नाही.. मधल्या काळात गर्दीची आठवण आणि आठवणींची गर्दी येउन झालेली असते...मग शांत असलेल्या वातावरणरुपी कॅन्वासात आवाजाचे रंग भरायला सुरुवात होते ….   जसं आपल्या मोकळ्या, काळ्या आकाशात आपल्या कल्पकतेच चांदणं चमकतं !!! :)

                                                                   - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - गुगल इमगेस pixcooler.com )

Tuesday, June 2, 2015

ती सावली

                                                                       
                                                                        ती सावली
नित्यनियमाने दर महिन्याच्या एखाद्या रविवारी रद्दी काढण्यास बसावा तशी मी बसले आणि खूप जास्त पेपर्स जमा झालेले, त्यातले लोकरंग आणि चतुरंग बाजूला काढले आणि सहजच वाचायला बसले. वाचता वाचता डॉक्टर संजय ओंक ह्यांच्या लोकरंग मधील 'जगात मनात' कॉलम वाचला आणि थक्कच झाले.. लेखाचा शीर्षक होतं दोन सावल्या आणि सुरुवातीला सरांनी लिहिलेलं की
एक सावली माणसाला पूर्णत्व देणारी , एक सावली त्याला अजिबात नको असणारी, एक सावली सुखद असत्य तर दुसरी दुखद सत्य .. एक सावली जीवन दुसरी मृत्यू ...
खरंच ह्या ओळी वाचल्यावर मनात एक प्रश्न उद्भवला की जगतो का आपण पूर्णपणे ?!  To the fullest?! आयुष्याच्या कठीण वळणावर कळतं की काहीतरी करायचा राहून गेलं, कुणालातरी काहीतरी सांगायचा राहून गेलं, कुणाकडून काहीतरी ऐकायचं राहून गेलं, घेत घेत कितीतरी द्यायचा राहून गेलं...खरंतर जगायचंच राहून गेलं!!
                      जगता जगता आपण किती खोटं बोलतो नं... मुखवटे घालून आयुष्य पुढे सरसावतो.. ह्या खोटेपणामुळे आपणच धडपडतो,  आपल्याच मनात कुजतो, नाती-गोती जपायला सुरुवात होते.. मनातल्या मनात आपण खोटे असून जगाला आपण खरे असल्याचा मुखवटा घालून समाजात वावरतो. कोणे एके काळी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणणारे आपण भीत भीत जगतो. मग मनात विचार येतात जे आपल्यलाला भूतकाळात बांधून ठेवतात आणि भविष्यातही घेऊन जातात पण ह्या नादात वर्तमानाला न्यायच मिळत नाही. जगणं किती सुंदर असू शकतं ते आपल्याला दुसऱ्यांच आयुष्य वाचल्यावर, ऐकल्यावर, पाहिल्यावर कळतं. स्वतः स्वताचे मार्गदर्शक व्हायचं ते दूरच राहिलं! निर्जीव वस्तूत सुद्धा आत्मा असतो पण आपला आत्मा निर्जीव झालेला असतो...
                            आणि अशा एका कठीण वेळी ती सावली समोर येते जी प्रत्येकच आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने संधी साधून येते,जिचा आपल्या सर्वांना राग, तिरस्कार वाटतो ... मृत्यू... ती तिचं काम करत असते, आपल्या कामातून आपल्याला घेऊन जाते... death ...सून्न करणारी.. मृत्यूची चाहूल लागल्यावर आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते अचानक .. मग पुन्हा नाती जोडावीशी वाटतात... संपूर्ण आयुष्य एकट्याने चाललेलो असतो आपण, आत्ता कोणीतरी हवं असतं आपल्याला.. मग लक्षात येतं की तेव्हा सगळ्यांना घेऊन चालायला हवं होतं... सर्वांच्या चुका काढणारे आपण, आपल्या बाबतीत घडता तेव्हा बोट वळवतो .. ही सावली आपल्याला कवेत घेण्यास सज्ज असते.. आपण मात्र पुन्हा जगण्याच्या संधीच्या शोधात असतो ....
             
                                                              - अपूर्वा
(छायाचित्र सौजन्य - लाइट वर्डस) 

Wednesday, May 27, 2015

NOSTALGIA ...

बा … प … रे … अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा ब्लॉगवर लिहायला सुरवात केलेली तेव्हा खरं म्हणजे डोक्यात चित्र clear होतं की आपल्याला काही रोजच; किंवा रोज कशाला, नियमित सुद्धा लिहायला नाहीच जमणार बहुदा ! अभियांत्रिकी करताना, आणि तेही शेवटच्या वर्षी, असले छंद जोपासायचे म्हणजे एकाच वेळी दोन नावांवर पाय ठेवण्यासारखं आहे … आणि नाही, ही काही अतिशयोक्ती नाही … पण जिथे कित्येकदा जेवायला सवड मिळायची नाही तिथे लिहिण्या-बिहीण्याचे चोचले कसे हो घ्यायचे पुरवून !!! तर सांगायचा मुद्दा असा की लिहिण्यात खंड पडणार हे गृहीत धरलेलंच होतं, पण तो खंड अक्षरशः आशिया खंडाएवढा मोठ्ठा असेल असा विचार नव्हता केला कधी. परीक्षा, assignments, परीक्षा, project, viva … साखळीच लागली जणू … आणि आता आज वेळ मिळतोय … ना, किंबहुना योग जुळतोय पुन्हा लिहिण्याचा …

असो … परीक्षा संपून, घरी परत येउन आता आठवडा लोटलाय जवळपास. काय वाटतंय नक्की सांगता नाही येणार … डिग्रीची चार वर्ष संपली, rather संपली सुद्धा ? असं वाटतं परवाच तर मी सामान बांधून मुंबईला निघाले होते engineer व्हायला … ICT मध्ये प्रवेश मिळाला, हॉस्टेल मिळायला सुद्धा फारशी अडचण आली नाही … सुरवातीला अवघड वाटत होतं सगळंच … पण मग कॉलेज, हॉस्टेल, मुंबई सगळ्याचीच सवय झाली हळूहळू. चार वर्षांत डोंगराएवढं शिकायला मिळालं आणि असंख्य माणसं जोडली गेली … अशा अगणिक आठवणी मनःपटलावर कोरल्या गेल्या ज्या या जन्मात तरी विसरणं निव्वळ अशक्य आहे. कॉलेजचे मोहोत्सव … पहिल्या वर्षी जवळ-जवळ सगळ्याच कार्यक्रमात केलेली गाढवासारखी मेहनत … प्रत्येक परीक्षेच्या बरोबर आदल्या दिवशी हॉस्टेलवर घातलेला धुमाकूळ आणि मग अर्थातच जागवाव्या लागलेल्या रात्री … प्रयोगशाळेत केलेली मज्जा … दिवाळीच्या सुट्टीत काढलेल्या सहली … मराठीचा वारसा जपणाऱ्या आमच्या 'मंथन' या सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम … त्या ओघातच सादर केलेली नाटकं, गाणी … सणावाराला हॉस्टेल मध्ये रंगलेल्या त्या 'dj nights' … शेवटचं वर्ष म्हणून हॉस्टेल मधल्या मुलांबरोबर केलेला आणि अजिबातच न जमलेला तो नाच … आणि मग हळू हळू जवळ आलेला शेवट … सगळ्यांबरोबर केलेलं शेवटचं lecture, शेवटची परीक्षा, शेवटची पार्टी, शेवटचा सिनेमा, शेवटचं जेवण, हॉस्टेल मधला शेवटचा दिवस … निरोप-समारंभ … निघताना डोळ्यात उभं राहिलेलं पाणी … भेटण्या-बोलण्याची दिलेली वचनं … आणि काहीतरी मागे राहून गेल्यासारखी अखंड वाटणारी हुरहूर … 

साधारण दिवेलागणीच्या वेळेस मी एकटीच खिडकीशी बसलेली असते. अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक हृदय स्पर्शून जाते. आणि या सगळ्या आठवणी एका पाठोपाठ एक मनावर कोसळू लागतात … कुठेशा वाचलेल्या ओळी आठवतात … 


मनाच्या गाभाऱ्यात 
आठवणी दाटतात 
पापण्यात साठतात 
स्मृतीची गवतफुले 
दुरूनच वेडावतात 
हर्षाचे दवबिंदू 
मोत्यापरी चमकतात 
ओंजळीत घेताना 
क्षणभरात निसटतात … 

आठवणींचे हे दवबिंदू माझ्या ओंजळीतून कधीच निसटू नयेत असं वाटत राहतं. हे मोती शब्दांच्या शिंपल्यात कायमचे जपण्यासाठी मन धडपडू लागतं. हात नकळत लेखणीकडे वळतात आणि कागदावर अविरत होत राहते, आठवणींची पानगळ ……

-निकिता